जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावातील वडील व मुलगा कामावरून घरी परत येत असताना दुपारी चारच्या सुमारास वडिलांचा अचानक मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील बनोटी – शिंदोळ रस्त्यावर सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास रोजंदारीचे काम करून परतत असतांना आगी मोहळच्या मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल (वय – ५८) यांच्या तोंडाला मधमाशा चावल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सैय्यद इस्माईल हे मजुरी करून आपला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. मयत सैय्यद इस्माईल यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.