जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून महसूल व पोलीस विभागात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे डंपर अडवून ३० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचारी घनश्याम अशोक पवार यांच्यासह खासगी पंटरला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार घनश्याम अशोक पवार यांना निलंबित करण्यात आले असून त्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घनश्याम पवार यांनी दि. ७ जानेवारी रोजी ठेकेदाराचे डंपर अडवत त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार केल्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. ९ रोजी सापळा लावत पवार यांनी खाजगी पंटर इम्रान खानकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितले. सुरूवातीला एसीबीने खाजगी पंटर व नंतर पवार यांना एसीबीने अटक केली होती. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पवार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी काढले.