जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली होती. तर गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे. तर लवकरच मारेकरी देखील गजाआड करू, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्टेशन रोडवरील हनुमानवाडी भागात भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांचे कार्यालय आहे. ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कार्यालयात बसले असता, एका चारचाकी वाहनातून पाच जण आले. त्यानंतर कार्यालयातन घुसून या पाच जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर मोरे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवले पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्यासोबत पोलिस पथक रात्री मारेकऱ्यांच्या शोधात असताना सायगव्हाण, नागद ते कन्नड रोडवर या गुन्हात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन रत्यावर बेवासरपणे आढळून आले. या गाडीमध्ये दोन जिवंत काडतूस, दोन खाली केस व एक कोयता आढळून आला आहे.
ही गाडी ज्या परिसरात आढळली, त्याच परिसरात मारेकरी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कन्नड व चाळीसगाव तालुक्यातील या परिसरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील सात संशयितावर चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर लवकरच या घटनेतील गोळीबार करणाऱ्यांना जेरबंद केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.