जळगाव मिरर | १४ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून येत्या पुढील २४ तासांत राज्यांतील कोकण विभागाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मुंबई आणि ठाण्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे, असे देखील भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ तासांत राज्यातील कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढेल, असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (रविवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रेड अलर्टनुसार, कोकणात मुसळधार पाऊस पडला. रायगडमध्येही पावसाची धुमशान सुरू आहे. मात्र, यलो अलर्ट असूनही मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाच्या दमदार सरी बरसल्या. रविवारपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यलो अलर्ट असूनही मुंबई आणि पालघरमध्ये सरींवर सरी बरसू शकतात.