जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
घराचा दरवाजा बंद करुन वडील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यामुळे तरुणीने गॅलरीत साडी बांधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने प्रेरणा विजय गजरे (वय १९, मूळ रा. यावल, ह. मु. मुंदडा नगर) ही तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंदडा नगरातील साईलक्ष अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगरातील शंभर फुटी रस्त्याला लागून असलेल्या मुंदडा नगरातील साई लक्ष अपार्टमेंटमध्ये विजय गजरे हे मुलगी प्रेरणा हिच्यासह काही दिवसापूर्वीच वास्तव्याला आले होते. विजय गजरे हे मूळचे यावल येथील असून ते माजी नगरसेवक आहे. मंगळवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी अमळनेर येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांची मुलगी ही घरातून कुठेही निघुन जाते म्हणून गजरे यांनी घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन ते सकाळीच घराबाहेर पडले. प्रेरणा हीने बराच वेळ दरवाजा ठोठावला, मात्र बाहेरुन कोणीही प्रतिसाद दिला नाही, आणि दरवाजाही उघडला नाही.
दरवाजा ठोठावून कोणीही दरवाजा उघडत नसल्याने प्रेरणा हीने घराच्या गॅलरीतून साडी एकमेकांना बांधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तीचा तोल जावून ती थेट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यामध्ये प्रेरणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने तरुणी गंभीर जखमी झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी रिक्षातून प्रेरणा हीला खासगी रुग्णालयात हलविले. मात्र तीची प्रकृती चिंजाजनक असल्याने डॉक्टरांनी तीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत प्रेरणा ही ला मयत घोषीत केले.
घटनेची माहिती कळताच प्रेरणाचे वडील विजय गजरे हे तात्काळ अमळनेर येथून जळगावला येण्यासाठी निघाले. ते जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी मुलीचा मृतदेह बघताच हंबरडा फोडीत हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला.विजय गजरे हे यावल नगरपरिषदेत माजी नगरसेवक आहेत. त्यांचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद असल्याने ते पती-पत्नी विभक्त राहतात. त्यांची पत्नी जळगावातील आंबेडकर नगरात माहेरी असते. लहान मुलगी दिव्या आईकडे तर मोठी मुलगी प्रेरणा वडिलांकडे राहत होती. गजरे यांचे यावल येथे रेशन दुकान असून ते काही दिवसापूर्वीच जळगावात राहायला आले.