
जळगाव मिरर | १९ मार्च २०२५
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मालेगावातील कुविख्यात दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला बेड्या ठोकत चोरी केलेल्या चार दुचाकी जप्त केल्या. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्यात ते पसार असल्याचे तपासात समोर आले आहे.
मोबीन शाहू शकील शाह (20, रा.चमननगर, मालेगाव, जि.नाशिक) दानिश शाह जहीर शाह (20, रा.गांधीनगर, मालेगाव, जि.नाशिक) व अमीर उर्फ अमीन शाह जहुन शाह (22, रा.भिस्ती मोहल्ला, शाहूनगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रविवारी ही एमआयडीसी पोलिसांनी गस्तीदरम्यान ही कारवाई केली.
रविवार, 16 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, रवींद्र चौधरी, नाईक प्रदीप चौधरी, रतन गीते, सिद्धेश डापकर, जयेश हटकर असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना संशयीत आढळल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट होताच त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी मालेगावात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले शिवाय मालेगावातील आझाद नगर पोलिसात दाखल गुन्ह्यात दोघे वॉण्टेड असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपींच्या ताब्यातून एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, मालेगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील चोरीची व अन्य एका विना क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. चारही दुचाकींचे बाजारमूल्य तीन लाख 50 हजार रुपये आहे.