जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४
जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेरी गावाजवळील वळण रस्त्यावर बांधलेल्या पुलावरील रस्ता हा वरखाली असल्याने शनिवारी (दि.२), झालेल्या वाहन अपघातात पहूरचे व्यापारी दिनेश बेदमुथा हे सुदैवाने बचावले. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरीजवळील जळगाव रस्त्यावर वळण रस्ता असून, या ठिकाणी पूल तयार केलेला आहे, पण रस्ता समतल नाही. तो वरखाली असल्याने त्यावरून जाताना वाहन हेलकावे खाते. शनिवारी, पहूर येथील रहिवासी तथा भुसार मालाचे व्यापारी दिनेश अनिल बेदमुथा जळगावहून आपल्या गावाकडे येत होते. पुलावर त्यांच्या वाहनाने (एमएच. १९ सी.झेड. ८०७०) खराब रस्त्यामुळे हेलकावे मारले. यामुळे बेदमुथा यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन संरक्षक भिंतीवर आदळून रस्त्याच्या कडेला खोल भागात कोसळले. वाहनात बेदमुथा यांच्याशिवाय कोणी नव्हते. ते सुदैवाने बचावले. महिनाभरात याठिकाणी घडलेला हा चौथा अपघात असल्याचे सांगितले जात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.