जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२३
दि.२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावर वीज मंडळ कार्यालयासमोर स्फोट होऊन कारला अचानक आग लागल्याने कारमध्ये झोपलेला पिता आणि मुलगा, असे दोघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील ओटा बुंदीया जिल्ह्यातील खेळणी व संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी अमळनेर शहराबाहेर आपले बस्तान मांडले आहे. त्यांची वस्तू वाहणारी ओमिनी गाडी त्यांच्या झोपडीशेजारी लावलेली होती. गाडीमध्ये रात्री कर्नल बागडीया (वय ६०) हे झोपलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन गाडीला आग लागली. या आगीत ते आणि त्यांचा तरुण मुलगा रामलाल (वय ३०) हे जखमी झाले. आग लागताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला. नितीन खैरनार, आनंदा झिम्बल, जफर खान यांनी दोन बंबांच्या सहायाने आग विझवली तोपर्यंत गाडीच्या टायरसह पूर्ण वाहन जळून खाक झाले होते. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक निंबा पाटील, शरद पाटील यांनी दिली. डॉ. इम्रान कुरेशी भेट यांनी प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही.