जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२४
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत सुरुवातीला एक हजार रुपयांचा मोबदला दिला. त्यातून विश्वास संपादन करीत नंतर मात्र खासगी ठेकेदाराला पावणेतीन कोटी रुपयात गंडविले. ही घटना दि. २६ जून ते दि. २६ नोव्हेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील खासगी ठेकेदारांना एका व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अजय गर्ग नामक व्यक्तीने अॅड केले. त्यानंतर या ग्रुपमधील रितू वोरा नामक व्यक्तीने लिंक पाठविली. एका अॅप्लिकेशनद्वारे शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार ठेकेदाराने अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफ्याचे अमिष दाखविल्यानंतर या ठेकेदाराने काही रक्कम गुंतविली. त्यावर एक हजार रुपये नफा म्हणून त्यांच्या खात्यावर जमा केला. त्यातून विश्वास संपादन करीत त्यांना अधिकची रक्कम गुंतविण्यास सांगितली. मात्र नंतर ते रक्कम गुंतवत गेले, मात्र त्यांना कोणताही नफा दिला नाही की मुद्दलही परत दिली नाही. दि. २६ जूनपासून ठेकेदाराच्या संपर्कात असलेल्या सायबर ठगांनी त्यांना रक्कम गुंतविल्यास सांगितली, ते त्या पद्धतीने रक्कम गुंतवत गेले.
तब्बल पाच महिने हा प्रकार सुरू होता, परंतु त्यानंतर कोणताही मोबदला मिळत नव्हता. या पाच महिन्यात वेळोवेळी ठेकेदाराने रक्कम गुंतविल्याने त्यांच्या हातची २ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम गेली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजय गर्ग व रितू वोरा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.
शेअर ट्रेडिंग, विमा, वीज बिल यासह वेगवेगळ्या कारणांनी सायबर ठग संपर्क साधून अनेकांची फसवणूक झाल्याच घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये लाखात होणारी फसवणूक आता कोटींमध्ये पोहचली आहे. या पूर्वी जिल्ह्यात दोन वेळा एक कोटींपेक्षा अधिक रकमेमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर आता तर थेट २ कोटी ७२ लाखांमध्ये फसवणूक झाली असून एकाच जणाची एका वेळी होणारी ही सर्वात मोठी फसवणूक ठरली आहे