जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।
सोशल मीडियामुळे अवघ्या राज्यात व्हायरल झालेली गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण नवं राहिलेलं नाही. तिचा कोणताही कार्यक्रम वादाशिवाय पूर्ण होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येतं. त्यातच आता गौतमी पाटीलच्या आणखी एका कार्यक्रमात तुफान राडा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता इथे आयोजित कार्यक्रमात हा राडा झाला असून हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ झाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. तर मोठ्या बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर काढावे लागले.
राहाता / अहमदनगर
-गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज, लोकं जीव मुठीत घेऊन पळाले, व्हिडीओ व्हायरल
VIDEO Credit : Sachin Bansode#Ahmadnagar #GautamiPatil #Rahata #Police #ViralVideo pic.twitter.com/vrBPMqU4kW
— Satish Daud (@Satish_Daud) February 24, 2023
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे २३ फेब्रुवारी गुरुवारी रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र गौतमीचा डान्स सुरु होताच काही प्रेक्षकांनी तिच्यावर पैशांची उधळण सुरु केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबवल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची एकच धावपळ उडाली आणि आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. एवढं होऊनही काही प्रेक्षकांनी गौतमी पाटील गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला अखेर बाऊन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडली.