जळगाव मिरर | ९ फेब्रुवारी २०२४
शहरातील स्वातंत्र्य चौकात दोन गटात शाब्दिक वाद सुरु होते. त्यांचा वाद वाढतच असल्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी गावठी कट्टे काढून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार तेथे कर्तव्य बजाविणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी चौघांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिसात आणले. याठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्वातंत्र्य चौकातील एका हॉटेल समोर (एमएच १८ बीआर ९००९) क्रमांकाच्या कारमधून दोन जण आले. त्याठिकाणी (एमएच १९ ईसी ६७२८) क्रमांकाच्या दुचाकीवर बसलेल्यांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढतच असल्याने दोन्ही गटातील गोल्या उर्फ लखन दिलीप मराठे, सोन्या उर्फ सोनू गणेश चौधरी, चेतन उर्फ भैय्या रमेश सुशीर आणि अतुल कृष्ण शिंदे हे सराई गुन्हेगार एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही गटातील संशयितांनी त्यांच्याकडे असलेल्या गावठी कट्टे काढून एकमेकांवर रोखून धरले. हा प्रकार चौकात कर्तव्यावर हजर असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोलीसांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ दोन्ही गटातील भांडण मिटवित चौघांना ताब्यात घेतले. एकमेकांवर कट्टा रोखल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन्ही वाहने व गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. असून त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.