जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२५
सर्वात मोठा धार्मिक महोत्सव म्हणून ओळख असलेल्या कुंभमेळ्याची आज सोमवार १३ जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर आज पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान संपन्न होणार आहे . सोमवारी १३ जानेवारी ते बुधवार २६ फेब्रुवारी असे तब्बल ४५ दिवस महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला आहे. या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.
या महाकुंभ मेळाव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होत आहे. हा महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यादरम्यान एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या कुंभमेळाव्यातील पहिला शाही स्नान 13 जानेवारी म्हणजे आज पार पडणार आहे. तर दुसरं शाही स्नान 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी असेल. यानंतर तिसरं स्नान 29 जानेवारी 2025 रोजी मौनी अमावस्येदिवशी होईल. तर चौथं स्नान 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमी दिवशी होईल. यानंतरचे पाचवे शाही स्नान 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा दिवशी आणि शेवटचं शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री दिवशी असेल.