
जळगाव मिरर | २६ जून २०२६

मेहरुण तलाव परिसरातील सुबोनिया पार्कमध्ये गावठी पिस्तूल कमरेला लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. समीर खान जावेद खान (वय २५, रा. तांबापुरा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर खान हा मेहरुण परिसरातील सुबोनिया पार्क भागात बेकायदेशीर कृत्य करण्याच्या उद्देशाने आणि परिसरात स्वतःचा वचक निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरत होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश ठाकरे, सुभाष साबळे आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन समीरला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी ते पिस्तूल जप्त करून समीरला अटक केली. पोलिस कोठडीत असताना तपासाधिकारी विजयसिंग पाटील यांनी समीरची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने हे पिस्तूल जावेद शेख सलीम शेख (रा. दत्तनगर, मेहरुण) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ जावेदच्या घरावर छापा टाकला; मात्र पोलिस येण्यापूर्वीच तो फरार झाला.





















