जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घटना घडत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विहिरीत पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिघवद गावच्या शिवारातील गांगुर्डे वस्तीवर घडली. माय-लेकाच्या दुर्दैवी मृत्यूळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांगुर्डे वस्ती (दिघवद) येथे शिवांश दौलत गांगुर्डे (२ वर्षे २ महिने) हा सोमवारी (दि. ७) सकाळी ९ च्या खेळत असताना विहिरीत पडला होता. त्याला वाचविण्यासाठी आई पूजा (२७) यांनी धाव घेतली. त्यांनी पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आटापिटा केला. मात्र, त्या हाताने दिव्यांग असल्याने त्यादेखील तोल जाऊन विहिरीत पडल्या. विहिरीत पाणी असल्याने माय-लेक दोघांनाही जलसमाधी मिळाली. ही घटना समजताच भोवतालच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत पाणी अधिक असल्याने पूजा व शिवांश यांचा शोध घेणे अवघड झाले होते.
तब्बल तीन ते चार तासांनंतर पूजा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. नंतर विहिरीतील पाणी उपसण्यात आले, तरीदेखील सायंकाळपर्यंत शिवांशचा मृतदेह हाती लागला नव्हता. पोलिस निरीक्षक कैलास वाघ, पोलिस उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे हे घटनास्थळी हजर होते. पूजा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.