जळगाव मिरर | १४ मे २०२४
अचानक वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने सोमवारी मुंबईला जोरदार तडाखा दिला. यात घाटकोपर, छेडानगर येथील बेकायदा महाकाय होर्डिंग सोमवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास येथील पेट्रोल पंपावर कोसळले. या अपघातात अनेकजण होर्डिंगखाली अडकले. यातून सुटका केलेल्यांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. जखमींना जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदा उभारले असल्याचे समोर आले असून कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
घाटकोपर, छेडानगर येथे कोसळलेले १२० बाय १२० फुटांचे होर्डिंग रेल्वे हद्दीत बेकायदेशीररीत्या उभारले होते. या ठिकाणी नियमानुसार ४० बाय ४० फुटांचे होर्डिंग उभारण्याची परवानगी संबंधित कंपनीला पालिकेने दिली होती. मात्र याकडे संबंधित इगो मीडिया कंपनीने दुर्लक्ष करीत २२ एप्रिलपासून होर्डिंगसाठी बेकायदा बांधकाम सुरू केले.