
जळगाव मिरर | ४ जून २०२६

जळगाव : शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात कार चालवून तब्बल ८ ते ९ जणांना जोरदार धडक दिली. या हिट अॅण्ड रनच्या घटनेमध्ये दोन दाम्पत्यांसह एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ३ जून रोजी सायंकाळी रामानंद नगर चर्चजवळ घडली. चालक वाहन सोडून पसार झाला होता. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंदनगर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. याच वेळी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रामानंदनगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने भरधाव वेगात कार चालवत येत होता. रामानंदनगर परिसरातील चर्चजवळ आल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. अनियंत्रित झालेली ही कार थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर घुसली आणि त्याने तब्बल आठ ते नऊ जणांना उडवले. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या धडकेत दोन दाम्पत्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे.
अपघात झाल्यानंतर जमाव गोळा होऊ लागला. ‘पब्लिकचा मार बसेल’ या भीतीने घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने कार तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी तत्परता दाखवली. त्यांनी अजिबात वेळ न दवडता सर्व जखमींना तातडीने रिक्षा आणि इतर उपलब्ध वाहनांतून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी सर्व जखमींना रुग्णालयात हलवले होते. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत असून पसार झालेल्या अल्पवयीन चालकाचा शोध घेतला जात असून तो मुलगा शहरातील एका फर्निचर व्यावसायीकाचा मुलगा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल आहे.




















