जळगाव मिरर | ६ जानेवारी २०२५
चीनमध्ये कोरोनासारख्या महाखतरनाक व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर आता आणखी एक नवा व्हायरस दिसून आला आहे, जो अत्यंत धोकादायक मानला जात आहे. हा व्हायरस चीनमधून भारतात दाखल झाला आहे. बंगळुरूतील एका ८ महिन्यांच्या मुलाला या व्हायरसची लागण झाली असून, त्याच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर HMPV (Human Metapneumovirus) व्हायरस असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुलाला ताप आल्यामुळे एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याची चाचणी झाली. बंगळुरूतील लॅबने त्याची पुष्टी केली आहे, मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप यासंबंधी अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत असून, त्याचा प्रकोप पाहता चीनच्या विविध राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना या व्हायरसचा अधिक धोका आहे, आणि रुग्णालयांमध्ये लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अधिक रुग्ण दाखल होत आहेत.
भारत सरकारने या नवा व्हायरसच्या पाश्वभूमीवर अधिक सजगता दाखवली आहे. HMPV व्हायरसची शक्यता ओळखून आरोग्य मंत्रालयाने श्वसन आणि इन्फ्लुएंझाशी संबंधित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या व्हायरसच्या संभाव्य प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी अधिक लॅब्स उघडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि आयसीएमआर (ICMR) यांना या व्हायरसच्या निगराणी व तपासणीसाठी निर्देश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) ताज्या माहितीची अदलाबदल करण्याचे सांगितले आहे. भारत सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, देशात या नव्या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत आणि प्रशासन सज्ज आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचना आणि उपाययोजनांचा अवलंब करून भारताने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.