
जळगाव मिरर | २० मार्च २०२५
रावेर तालुक्यातील एका इसमाला हनी ट्रॅपमध्ये अडकावून त्याच्यासोबत शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार केला. तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या इसमाकडून खंडणी स्विकारणाऱ्या महिलेला रावेर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील एक इसम सन २०१८ मध्ये जळगावला जात असतांना एका महिलेने त्यांना लिफ्ट मागितली. त्यानंतर त्यांची मैत्री झाल्यामुळे त्या महिलेने त्या इसमाला घरी जेवणासाठी बोलावले. यावेळी कोल्ड्रींकमध्ये गुंगीचे औषध पाजून त्या इसमासोबत महिलेने शारिरीक संबध करीत त्याचा व्हिडीओ तयार केला होता. तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिलेने त्या इसमाकडून पैसे मागू लागली. बदनामीच्या भितीपोटी आतापर्यंत महिलेसह तिच्या मुलाच्या खात्यावर त्या इसमाने ११ लाख रुपये दिले होते. मात्र त्या महिलेकडून पैशांसाठी आणखीनच लगादा लावला जात होता.
त्या इसमासने घडलेली घटना रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याकडे कथन केली. दरम्यान, दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास ती महिला पैसे घेण्यासाठी रावेर येथे आली असता, डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि अंकुश जाधव, उपनिरीक्षक प्रिया वसावे, माधवी सोनवणे, महेश मोगरे, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचला. महिलेने त्या इसमाला एक लाख रुपये घेवून रावेर बऱ्हाणपुर मार्गावरील एका दुकानाच्या परिसरात बोलावले. तेथे पैसे घेतांना सापळा लावून बसलेल्या पथकाने महिलेला रंगेहाथ पकडले. त्या इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्या महिलेला अटक केली असून तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहेत. दरम्यान, अशीच अनेकांची फसवणूक झाली असल्यास तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.