जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली असून, या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून १ लाख ६० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी दि.२ दुपारच्या सुमारास बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बळीराम पेठेतील ए.जी.एम. प्लाझा अपार्टमेंटमध्ये मुजाईद खान अय्यूब खान हे वास्तव्यास आहे. दि. १ रोजी रात्रीच्या सुमारास ते उस्मानिया पार्कमध्ये त्यांच्या बहिणीकडे गेले होते. रात्री पावसाचे वातावरण असल्याने ते तिथेच मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या आई वडिलांना बाहेरगावी जायचे असल्याने मुजाहिद यांची बहीण ही घरी आली होती. मात्र, त्यानंतर ती घराला कुलूप लावून पुन्हा मोठ्या बहिणीकडे निघून गेली. त्यानंतर दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ अबुबकार खान हा घरी आला असताना त्याला घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही, तसेच घराचा दरवाजाही उघडाच होता. त्याने घरात जाऊन पाहणी केली असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्याने घडलेली घटना मुजाहिद याला सांगितली.
घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ घराकडे धाव घेतली. यावेळी त्याला घरातील लोखंडी कपाटाचे लॉक हे वाकलेले दिसून आले, तसेच त्यातील सोन्याचे दागिने, मोबाइल दिसून न आल्याने घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.