जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रिपरिप पावसाची हजेरी सुरु असल्याने गेल्या सात दिवसांपासुन जिल्ह्यात सुर्यदर्शन नसल्यामुळे बळीराजा मेटाकूटीस आला आहे. तर शहरात देखील या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महिना अखेर सह ऑगस्टचा पहिला आठवडा देखील ढगाळ वातावरणासह पावसाचाच असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
रविवार दि. २१ पासून जिल्ह्यात मध्यम व दमदार पावसाची हजेरी कायम आहे. दररोज दिवसभर पावसाची रिपरिप व ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. या पावसामुळे आरोग्याच्या समस्या, ज्येष्ठांसह बालकांना उद्भवू लागल्या आहेत. भिजपावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतांमध्ये तण वाढले असून फावरणी करण्यासाठी देखील सात दिवसांपासुन सूर्य दर्शन नाही. हवामान विभागाकडून या पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आज दि.२९ व ३० रोजी जिल्हाभरात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून बुधवार दि. ३१ रोजी देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे आता पिके करपण्याची तसेच खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट दरम्यान हलका व मध्यम पाऊस राहण्याची अथवा ढगाळ वातावरण राहील तसेच सुर्य दर्शन क्वचित होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. दुषित पाण्यामुळे देखील आरोग्य धोक्यात येत आहे.