
जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
भुसावळ शहरातील २४ वर्षीय विवाहितेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला आहे. पतीनेच हा खून केल्याचा संशय असून ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी शहरातील द्वारका नगरात घडली. या प्रकरणी संशयित पतीला पोलिसांनी मनमाड येथून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा अजय गुंजाळ (वय २४) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर पोलीस यंत्रणेचा संशय महिलेचा पती अक्षय गुंजाळ याच्यावर आहे. या दाम्पत्यात कुठल्यातरी कारणातून वाद झाला असावा व त्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पसार होण्याच्या प्रयत्नातील संशयित पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शहरातील द्वारका नगरात खून झाल्याची माहिती कळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या विवाहितेला ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून विवाहितेला मृत घोषीत केले. ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी झालेल्या या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे शवविच्छेदन बुधवारी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.