जळगाव मिरर | १७ एप्रिल २०२५
राज्याच्या राजकारणात महायुती व ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक येथील मेळाव्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण एआयच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा उबाठाने केला, असे बावनकुळे म्हणाले. बाळासाहेबांचा आवाज वापरुन त्यांच्या विचारांचा द्रोह केला आहे. आज वंदनीय बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. धिक्कार असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली. आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो, असेही बावनकुळे म्हणाले.
मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणाऱ्याला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती, असे बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवलेत. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.