
जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३

जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असूनही वाळू वाहतूक करणारे वाहन सुसाट धावत आहे. अशातच भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. ज्यात वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर थेट वस्तीत शिरल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात सहा जण जखमी झाले आहे.
मिळालेली माहिती अशी कि, आमडदे येथे आज दि ५ एप्रिल रोजी पहाटे वाळूची चोरटी वाहतूक करणारा भरधाव ट्रॅक्टर नागरिकांच्या वस्तीत घुसला. या दुर्घटनेत एका ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. वैशाली बालू सोनवणे (वय ११) असे बालिकेचे नाव आहे तर बानूबाई वाघ ( वय ४२) ही महिला आणि पिंकी सोनवणे ( वय ५) हे चिमुकली जखमी झाली आहे. ट्रॅक्टरच्या धडकेनं घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आमडदे येथील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील दोषी ट्रॅक्टर चालक हा घटनास्थळी आपले वाहन सोडून फरार झाला आहे.
वाळू माफियांवर कारवाई होत नसल्याने आजची दुर्घटना घडल्याचा आरोप आमडदेकरांनी केला आहे. या दुर्घटनेतील ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली नसली तरी कुठे तरी वाळू खाली केल्याचे दिसून येत आहे. वाळू खाली केल्यानंतर भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवल्यामुळं ही भयंकर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली असून तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला होता.आमडदे गावात या घटनेनंतर मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमा झाले होते. चालकाला पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.




















