अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक बस स्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच अमळनेर बस स्थानकावर देखील अशीच घटना घडली आहे. महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांनी महिला कॉन्स्टेबलच्याही कानशिलात मारल्याने त्यांना जेलची हवा खावी लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर बसस्थानकावर १७ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा बसमध्ये सारबेटे येथील प्रतिभा राजेंद्र कोळी या महिलेची सोन्याची पोत दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिलाच मारहाण केली. या वेळी बसस्थानक कर्तव्य बजावणारे अशोक कुमावत आणि महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांनी त्या महिलांना खाली उतरवून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले या वेळी नाशिक पंचवटी भागातील सुनीता सागर चौधरी (वय ३९) व जळगावच्या इच्छादेवी पोलीस चौकी मागे राहणाऱ्या ममता सतीश चौधरी (वय २५) या दोघींनी महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे यांच्या कानशिलात मारुन शिवीगाळ केली. जरे यांनी तत्काळ पोलिस गाडी बोलावून घेत दोन्ही महिलांना अटक केली.
या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करत आहेत. दोन्ही महिलांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे