जळगाव मिरर | ६ नोव्हेबर २०२४
दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने प्रणिता उमेश वाणी (२४, रा. कांचननगर) यांच्या गळ्यातील १० हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना टॉवर चौकात घडली. २८ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे दहा वाजता घडलेल्या या घटनेची ९ दिवसानंतर शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीची नोंद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिता या टॉवर चौकानजीकच्या आर्य निवास भोजनालयाच्या बाहेर असताना अंगात पांढरा शर्ट, काळ्या रंगाची पेंट व तोंडाला रुमाल बांधलेला दुचाकीस्वार याने अचानक येऊन प्रणिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची सोन्याची पोत तोडून पलायन केले. गर्दीचा फायदा घेत चोरटा काही क्षणातच या भागातून निसटला. याप्रकरणी शहर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.