
जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२४
बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांसह त्यांच्या पर्समधून रोकड लंपास होत असल्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. आठवड्यातून दोन ते तीन घटना घडत असल्याने त्या रोखण्यासाठी एक पोलिस कर्मचारी नियुक्त केला. मात्र येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असल्याने त्यांची सुरक्षेची जबाबदारी एका पोलिसावर दिल्याने तो कर्मचारी चोरीच्या घटना रोखू शकेल का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील अंगणवाडी सेविका विजया विजय हिवराळे (वय ४२) या जळगावात कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर त्या जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून जामनेर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्समधील एक हजार रुपये असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना चव्हाण करीत आहेत.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी नवीन बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र त्यातील बहुतांश कॅमेरे तांत्रिक कारणास्तव बंद असतात, परंतु जे कॅमेरे सुरु आहेत. त्यामध्ये काही अंतरापर्यंतच स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांना अधिकचा तपास करतांना अडचणी येत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. जळगाव आगारातील नवीन बसस्थानकात दिवसभरात सुमारे हजारपेक्षा अधिक गाड्या ये जा करीत असतात. त्यामुळे याठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांसह शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु असल्याने चोरटे याठिकाणाहून पर्ससह दागिने चोरुन नेत असल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे.
प्रवाशांच्या तक्रारीसह त्यांना मदतीसाठी नवीन बस स्थानकात पोलीस चौकी उभारण्यात आली होती. मात्र कालांतरणाने ही चौकी बंद पडल्यानंतर तीची दुरावस्था झालेली आहे. त्या पोलीस चौकी धुळीने माखलेली असून त्याठिकाणी पोलिसांना बसण्यासाठी देखील सुविधा नसल्याने पोलीस चौकशी अत्यंत दुर्दशा झालेली आहे.