जळगाव मिरर | ११ मार्च २०२४
पहाटे चार वाजेच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या शटरचे कुलूप तोडून चोरटा दुकानात शिरला. त्यानंतर दुकानातल्या तीन गल्ल्यांमध्ये ठेवलेली सुमारे पंधरा ते वीस हजारांची रोकड लांबवली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजता नवीपेठेतील नवजीवन सुपर शॉपमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीपेठ परिसरात सुनिल कांकरीया यांचे नवजीवन सुपर शॉप नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन कामगार घरी गेले. मात्र रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या शटरचे कुलूप तोडून चोरटा दुकानात शिरला. त्याने दुकानातील तीन काऊंटरमधील गल्ल्यात ठेवलेली सुमारे पंधरा ते वीस हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुकानातील अकाऊंटन किशोर नारायण पाटील हे दुकानावर आले असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती मालक सुनिल कांकरीया यांना दिली. त्यांनी देखील लागलीच दुकानावर धाव घेत पाहणी केली.
अकाऊंटन किशोर पाटील यांनी घटनेबाबत पोलिसांना कळविले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, उमेश भांडारकर, तेजस मराठे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दुकानाबाहेरी फुटेज तपासले असता, त्यांना चोरटा दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या शटर तोडून आत शिरतांना दिसून आला. त्याने चेहरा पुर्णपणे कापडाने बांधलेला असल्याचे फुटेजमध्ये कैद झाले आहे.
दुकानातील कॅमेरे होते बंद पोलिसांनी कांकरीया यांच्या दुकानातील कॅमेऱ्याची तपासणी केली असता, त्यांनी दुकानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी ते दुकानातील कॅमेरे बंद ठेवत असल्याचे सांगितले. तसेच पहाटे ३ वाजू ५५ मिनिटांनी चोरटा दुकानात शिरला, त्यानंतर तो साडेचार वाजेच्या सुमारास हातसफाई करुन बाहेर पडतांना दिसून येत आहे. चोरी झालेल्या दुकानासमोर एक प्रतिष्ठीत सोने विक्रीचे दुकान आहे. याठिकाणी रात्रभर सुमारे चार ते पाच सुरक्षा रक्षकांचा पाहरा असतो. त्यामुळे चोरट्याने दुकानाच्या समोरचे शटर न तोडता त्याने मागचे शटर तोडून त्याने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविली आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानात पहाटे तीन ते पाच वाजेदरम्यान, चोरी झाल्याची ही दीड ते दोन महिन्यातील ही पाचवी घटना आहे. या सर्व घटनांमधील वेळ ही पहाटेच्या सुमारास पोलिसांची गस्त पुर्ण झाल्यानंतर चोरटा डल्ला मारत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजवरुन समोर येत आहे. या सर्व घटनांमध्ये एकच चोरटा हातसफाई करतांना दिसून येत असल्याने पोलिसांना या सर्व घटनांमध्ये चोरटा एकच असल्याचा संशय असून ते चोरट्याचा कसू शोध घेत आहे.