जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील मुलभूत सुविधा, शैक्षणिक, सामाजिक विकास करणे हि माझी जबाबदारी आहे. त्यासाठी अनेक विकासकामे, उपक्रम राबवीत असतो. मात्र समाजात सज्जनशक्ती, भक्तीभाव जोपासण्यासाठी अध्यात्मिक केंद्रे देखील निर्माण होणे गरजेचे असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पहिले १२ ज्योतिर्लिंग मंदिर उभारण्याचा जेव्हा प्रस्ताव ब्रह्माकुमारी परिवाराने दिला तेव्हा कुठलाही किंतु परंतु न ठेवता त्याला होकार दिला. आज सर्वांच्या सहकार्याने एक मोठी अध्यात्मिक वास्तू चाळीसगाव वासियांसाठी खुली होत आहे, येणाऱ्या काळात हे अध्यात्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र होईल असा मला विश्वास आहे. कोट्यावधीचे काम करून जे समाधान मिळत नाही ते समाधान या १२ ज्योतिर्लिंग मंदिराने मिळाल्याचे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले.
ते चाळीसगाव येथील अंधशाळेजवळ ब्रह्माकुमारीज् तथा वर्ल्ड रिन्युअल स्प्रिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून व आमदार स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील एकमेव शिवलिंग आकारातील १२ ज्योतिर्लिंग मंदिर (ध्यान केंद्र) लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी ब्रम्हाकुमारीच्या जळगाव क्षेत्र निर्देशिका राजयोगिनी मीनाक्षीदीदी, चाळीसगावच्या संचालिका ब्रम्हाकुमारी वंदनादीदी, माउंट अबू येथील मधुबन निवासी विलासभाई, यांच्यासह योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, मार्केट सभापती कपिल पाटील, माजी गटनेते राजूअण्णा चौधरी, संजय रतनसिंग पाटील,, संजय भास्करराव पाटील, शेषराव बापू पाटील, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख घृष्णेश्वर तात्या पाटील, माजी सभापती रवीआबा पाटील, शेतकी संघ संचालक अविनाश चौधरी, प्रशांत देशमुख, किशोर पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, सुभाष पैलवान, रिपाईचे आनंद खरात, संदीप बेदमुथा, प्रवीण भोकरे, अमोल नानकर, रमेश सोनवणे, सरदारसिंग राजपूत, अविनाश चौधरी, महेंद्र राठोड, अजय वाणी, राकेश बोरसे, काकासाहेब माळी, विवेक चौधरी, सचिन स्वार यांच्यासह चाळीसगाव व जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मानवी जीवनात अध्यात्माचे मोठे महत्व आहे. आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी आत्म शांतीसाठी अध्यात्म हाच पर्याय उरतो. त्यामुळे चाळीसगाव मतदारसंघात स्वामीनारायण मंदिर उभारणी होत आहे, पाटणादेवीचा नवरात्र उत्सव, पंढरपूर वारी, गणपती उत्सव असे अनेक उपक्रम भाविक भक्तांसाठी राबविले जात आहेत. ध्यान आणि सेवाभाव केंद्रस्थानी ठेऊन काम करणाऱ्या ब्रह्माकुमारीज् ट्रस्टची १२ ज्योतिर्लिंग मंदिर उभारणीसाठी मोठी मदत झाली आहे. भारताचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु मोदीजी सुद्धा माउंट आबू येथे दादी आणि दीदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अनेकदा गेले आहेत. मंदिराच्या बाहेरून बारा ज्योतिर्लिंग प्रतिमा स्थापित केल्या आहेत. त्यामुळे भाविकांना सर्व बारा ज्योतिर्लिंग दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेच्या विकासासाठी अजून भरीव निधी देण्याची घोषणा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केली.
अश्यक्य ते शक्य करण्याची मंगेशदादांमध्ये ताकद, त्यांना परमात्म्याचा आशिर्वाद – ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी
बेंगलोर येथे असलेल्या १२ ज्योतिर्लिंग मंदिराच्या धरतीवर चाळीसगाव येथे मंदिर व्हावे यासाठी आमच्या ब्रम्हाकुमारी परिवाराने आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांना हि संकल्पना खूप आवडली आणि तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वस्त केले. कोणत्याही चांगल्या कामासाठी अडचणी येतात. जागेच्या अडचणी पासून ते स्थानिकांचा विरोध, निधी ची तांत्रिक बाबी पर्यंतच्या सर्व अडचणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दूर केल्या. आपल्या आमदारांच्या नावातच देव आहे, परमात्मा त्यांच्याकडून अनेक चांगले काम करून घेत असतो. अशक्य ते शक्य करण्याची त्यांच्यात ताकद आहे. ब्रह्माकुमारी परिवार कोणत्याच पक्षाचे काम करत नाहीत मात्र चांगल्या माणसांच्या चांगल्या कामांचे कौतुक नक्की करतो असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी जळगाव क्षेत्र निर्देशिका वंदनादीदी यांनी केले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. विधिवत आरती व पूजा केल्यानंतर फीत कापून १२ ज्योतिर्लिंग मंदिर लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हाकुमारी परिवार, भारतीय जनता पार्टी व आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालय यांनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालक अमोल नानकर यांनी केले तर आभार राजदीदी यांनी मानले, कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.