जळगाव मिरर । ४ मे २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे अवकाळीचे ढग कायम असल्याने सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. जळगावमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीलाच हवामानामुळे तापमानाचा पारा 40 अंशाखालीच आहे. यामुळे जळगावकरांना सध्या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळत असला तरी येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असून राज्यासह जिल्ह्यासाठी पुन्हा गुरुवारी व शुक्रवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला असून यादरम्यान वादळी वार्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज देखील दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांना वादळी वारा, ढगांचा गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे 24 तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. जळगावला आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
