जळगाव मिरर । २७ ऑगस्ट २०२३
दि.२७ रोजी सालाबादप्रमाणे येणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ जळगांव यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे यांच्या अध्यक्षतेखाली श्री आगमन सोहळा तसेच संपूर्ण गणेशोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आज प्रथम श्री आगमन नियोजन या विषयावर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी श्री आगमन सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख समस्या ज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या श्रींच्या मूर्तीला नेताना मार्गात येणारे महावितरण च्या विद्युत केबल, त्या सोबतच खाली झुकलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी, यश लॉन परिसरातील पिंप्राळा रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविणे, वाल्मिक नगर जैनाबाद परिसरातील मोठ्या मुर्त्यांसाठी रोड तसेच मार्गात असलेले अतिक्रमण हटविणे, शहरातील काही मंडळाचे आगमन सोहळे दि.8 ते 11 तारखे दरम्यान असल्याने त्यांचे शिस्तबद्ध नियोजन करणे, टेंट असोसिएशनचे वाढलेले दर व त्यांनी केलेली वृत्तपत्राद्वारे केलेली काही अपमानकारक माहिती या संबंधी निषेध नोंदविण्यात येऊन पुढील नियोजन बैठकीत टेंट असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव यांना चर्चेसाठी बोलावणे या प्रमुख समस्यांचे निराकरण व त्यासोबतच या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचे 350 वे वर्ष असल्याने मंडळाच्या माध्यमातून शिवकालीन घटनांना उजाळा देणे व शहरातील जुनी मंडळे ज्या प्रमाणे मंडपाच्या बाहेरील बाजूस भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळकांच्या प्रतिमा नवीन मंडळांनी देखील लावाव्यात अशी सूचना करण्यात आली.
याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दिपक जोशी,अविनाश खडके,अश्विन भोळे,अजिंक्य देसाई, हरीश कोल्हे, अमोल धांडे,आण्णा भोईटे, पंकज मोमाया, सुरज दायमा, राहुल परकाळे, दिपक दाभाडे, राकेश तिवारी,धनंजय चौधरी समवेत जुने जळगांव मित्र मंडळ, जयगणेश मंडळ, श्री वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ, श्री गणाधिश फाउंडेशन,नेहरू चौक मित्र मंडळ, स्नेहल प्रतिष्ठान पिंप्राळ्याचा राजा, आझाद क्रीडा सांस्कृतिक मंडळ, श्री कृष्ण गणेश मंडळ, वीर बाजीप्रभू मित्र मंडळ, न्यू अचानक मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, मजदूर अनमोल मित्र मंडळ, एम जी रोड मित्र मंडळ, श्री गौरीसुता मित्र मंडळ, चंद्रप्रभाचा मोरया मंडळ, अमर चौक मंडळ, जय वाल्मिक बहुद्देशीय संस्था, श्री गर्जना मित्र मंडळ, श्री मार्केट यार्ड गणेश मित्र मंडळ,शिवतीर्थ मित्र मंडळ, दिपक तरुण मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, श्री संकटमोचन जय मारोती बहुद्देशीय संस्था… आदी गणेश मंडळे सहभागी होते.