
जळगाव मिरर | २५ मे २०२६
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता व इतर दैनंदिन कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्मार्ट कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत असल्याचा गंभीर आरोप करत कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, कमी करण्यात आलेल्या साई मल्टी सर्व्हिसेसच्या ६० ते ८० कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक एस. लाडवंजारी यांनी केली आहे.
याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, स्मार्ट कंपनीला शासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता आणि इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा मक्ता देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित कंपनीकडून वेळेवर साफसफाई केली जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, साई मल्टी सर्व्हिसेसच्या जवळपास ६० ते ८० कामगारांचे काम अचानक बंद करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामगारांनी कोरोना काळापासून सातत्याने सेवा बजावली असून, कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कामगार कमी झाल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व इतर महत्त्वाच्या कामांवर परिणाम झाला असून, उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, कंपनीकडून सुशिक्षित युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली झाल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रीपदे असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्यूरोसर्जन उपलब्ध नसल्यामुळे गंभीर रुग्णांचे हाल होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे तातडीने न्यूरोसर्जनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
साई मल्टी सर्व्हिसेसच्या कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर पुन्हा रुजू करून घेतले नाही, तर संबंधित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिला आहे.






















