
जळगाव मिरर | १८ मे २०२३

शहरातील मुख्य चौक असलेल्या आकाशवाणी चौकात चारचाकी वाहनाच्या बोनटवर बसून स्टंटबाजी करणे चार जणांना चांगलेच महागात पडले आहे. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची रामानंदनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून चौघांविरुद्ध बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ संजय सपकाळे, उमेश पवार व राजेश चव्हाण हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अस्थापना बंद करीत होते. यावेळी त्यांना आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरुन एक वाहन नागमोडी पद्धतीने वेगाने चालताना दिसून आले. त्या वाहनाच्या बोनटवर दोन व्यक्ती बसलेले होते. तसेच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार करण्यासाठी ते जोरजोरात ओरडत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी (एमएच १९ बीजे ५९५१) क्रमांकाचे वाहन थांबविले. त्या वेळी पोलिसांनी या विषयी विचारणा केली. तसेच त्यांना ताब्यात घेतले.
विठ्ठल भागवत पाटील (वय ४०, रा. ज्ञानदेव नगर), अक्षय सपकाळे (वय- ३४, रा. खेडी आव्हाणे, ता. जळगाव) हे दोघ वाहनाच्या बोनटवर बसलेले होते. तसेच ते वाहन गौतम यशवंत पानपाटील (वय ३८, रा. सावखेडा बु. ता. जळगाव) हा वाहन चालवित होता तर देवेंद्र सोपान सपकाळे (वय २५, रा. खेडी आव्हाणे ता. जळगाव) हा आला रे आला मन्या सूर्वे आला’ या गाण्यावर व्हिडीओ तयार करुन ते नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होते. पोलिसांना हा प्रकार दिसताच त्यांनी लागलीच चौघ संशयितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. यावेळी वाहनाच्या बोनटवर बसलेल्यांसह वाहन चालविणारा व व्हिडीओ तयार करणारा असे चौघांविरुद्ध पोलिस कर्मचारी राजेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विठ्ठल पाटील याने घटनेनंतर माफी मागितल्याचा व्हीडिओदेखील व्हायरल होत आहे.




















