जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२४
शहरातील आकाशवाणी चौकाजवळून चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून एकुण चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. शोएब हबीब शाह वय-२५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एम.जे. कॉलेज समोर पार्किंगला लावलेली अफसर अहमद शेख मुनीर रा. अलमास कॉलनी, जळगाव यांची पार्किंगला लावलेली (एमएच १९ इएल ३८९३) क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना चोरीला गेलेली दुचाकी ही संशयित आरोपी शोएब हबीब शहा याने चोरी केल्याची माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आकाशवाणी चौकात सापळा रचून चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शहा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याने इतर चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रामानंदनगर पोलिसांनी दिली आहे.