जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२४
राज्यात राजकीय वातावरण तापले असून आता यंदाच्या निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. जालना येथील आंतरवाली सराटीत गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणूक संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आजच्या बैठकीत जरांगे पाटील म्हणाले- जिथे उमेदवार निवडणून येण्याची शक्यता आहे तिथेच आपले उमेदवार उभे करा. याचबरोबर एससी आणि एसटीच्या जागा असलेल्या ठिकणी आपला उमेदवार द्यायचा नाही. जे कोणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावेत. अर्ज भरण्याच्या शेवटीच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय देईल. समीकरणे जुळवणे आवश्यक आहे. सर्व उमेदवारांनी फॉर्म भरुन ठेवावेत. पण फॉर्म काढ म्हटल्यावर काढून घ्यायचा. तसे न केल्यास मी त्या मतदारसंघात लक्ष घालणार नाही. आपल्या मागण्या मान्य असणाऱ्यांना मतदान द्यायचे, असे जरांगे म्हणाले. वेळोवळी सूचना केल्या जातील, त्या पाळाव्यात. समीकरण जुळल्यानंतर पुढील मार्ग सोपा होईल, असेही जरांगे म्हणाले. 36 मतदारसंघांमध्ये मराठ्यांचे 1 लाख मतदार असल्याचे जरांगे म्हणाले.
जिथे निवडून येथील तिथे अपक्ष उमेदवार उभा करावा, असे जरांगे म्हणाले. ज्या ठिकाणी निवडून येणार नाहीत, तिथे जो आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबत बाँडवर लिहून देतील त्याला निवडून द्यायचे अन्यथा सर्व पाडायचे, असे जरांगे म्हणाले. एससी आणि एसटीच्या जागांवर उमेदवार द्यायचे नाहीत, असेही जरांगेंनी सांगितले.
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने मराठ्यांची घरे उन्हात बांधली आहेत. फडणवीस अत्यंत क्रुर माणूस आहे, असे म्हणत टीकास्त्रही डागले आहे. सरकारने आमच्यावर ही वेळ आणली आहे. मविआ असो की महायुती असो आम्हाला कुणाचेच ऐकायचे नाही. लोकांना दोन्हीकडील राजकीय नेत्यांचे नावाने राग येत आहे. मराठा समाजाची काय चूक आहे की 70 वर्षे तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही. आता या सर्व गोष्टीचा हिशोब होणार. मी देत नाही ही भूमिका घेणाऱ्यांना आम्ही पाडल्याशिवाय सोडणार नाही.