जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२३
राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या बंडखोरीपासून मोठा हाहाकार माजला असतांना अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांचे नेतृत्व मान्य केले असून त्यातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही अजित पवार यांच्या तंबूत असल्याची चर्चा जोरदार सुरु असून भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी असा दावा केला आहे. जयंत पाटील यांचा लवकरच भाजपत प्रवेश होईल, असे ते म्हणालेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला जयंत पाटील समर्थकांनी हजेरी लावली होती. त्याच वेळी जयंत पाटील सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच ते देखील भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील तिथे उपस्थित होते. ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगितले जात होते. मात्र जयंत पाटील हे तर कुटुंबातील नाहीत, मग ते तिथे कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
खासदार संजयकाका पाटील यांनी मिरज येथील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील लवकरच भाजपत येतील असा दावा केला. जयंत पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जातात की भाजपमध्ये येतात हे पाहू. निशिकांत पाटील या होकायंत्राने आता आपल्याला इशारा दिला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले आहे.