पाचोरा : प्रतिनिधी
नोकरीस लावुन देण्याचे आमिष दाखवत युवकाकडुन वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील गणेश मोतीलाल गढरी (वय – ३२) यांना शिपाई पदावर नोकरी लावुन देतो असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार रा. मोहलाई ता. सोयगाव जि. औरंगाबाद यांचे परिचयातील सागर रतन बागुल रा. एकलहरे, मेन गेट सामनगांव रोड, ता. जि. नाशिक व एस. पी. बोडखे रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे यांचेशी गणेश गढरी यांची ओळख करुन दिली.
आपणास नोकरी लावुन देतो असे आमिष दाखवत दि. १९ मार्च २०२१ ते दि. १९ जानेवारी २०२२ या कालावधीत गणेश गढरी यांचेकडुन सागर बागुल यांनी त्यांच्या फोन पे वर वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपये उकळले. गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधी मागुन पैसे देतो असे सांगत वेळ मारुन नेत होते. दरम्यान गणेश गढरी यांनी दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे . या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.