
जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला नोकरीचे देण्याचे अमिष दाखवित भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या व्यक्तीने ९ लाख ८६ लाख रुपयात ऑनलाईन गंडविले. आपली फसवणुक झाल्याची खात्री होताच तरुणाने तात्काळ सायबर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाई ठगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात २६ वर्षीय तरूण हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. उच्चशिक्षीत असलेला तरुण बेरोजगार असल्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता. दि. १ डिसेंबर २०२४ रोजी त्याला भाषा मुखर्जी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मेलवरून तसेच मोबाईल वरून त्याच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर बेरोजगार असलेल्या तरुणाला चांगला जॉब मिळवून देतो असे अमिष दाखवून त्याचा विश्वास संपादन केला. दरम्यान, त्या ऑनलाईन ठगांनी तरूणाकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल ९ लाख ८६ हजार रूपयांची ऑनलाईन रक्कम स्विकारली.
तरुणाने वेळोवेळी पैसे देवून देखील त्याला चांगला जॉब मिळत नव्हता. तसेच त्यांना दिलेली रक्कम देखील परत मिळत नसल्याने तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने थेट सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार बुधवार दि. १ जानेवारी रोजी संशयित भाषा मुखर्जी नाव सांगणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीष गोराडे हे करीत आहे.