
जळगाव मिरर | ३० मे २०२६
शहरातील स्टेट बैंक कॉलनीत शुक्रवारी एक हृदयद्रावक घटना घडली. शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला काही तास उलटत नाही, तोच एका ३१ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुकुंद राजेंद्र न्याहाळदे (३१, रा. स्टेट बँक कॉलनी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी वडिलांच्या सेवानिवृत्तीनिमित्त घरात तयारी सुरू असतानाच मुलाने गळफास घेतल्याची घटना पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. मुकुंद हा चालक म्हणून काम करत होता. त्याचे वडील राजेंद्र न्याहाळदे हे विदगाव (ता. यावल) येथील शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले. यानिमित्त शुक्रवारी शाळेत त्यांच्या निरोप समारंभ होता. सर्व न्याहाळदे कुटुंबीय, नातेवाइक विदगाव येथे गेले होते. तेथे सोबत जेवण केल्यानंतर मुकुंद दुचाकीने घरी परतला. त्यानंतर खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला. बराच वेळ झाला तर बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. त्या वेळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला जीएमसी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.





















