अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन आणि दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड (श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) क्षेत्रिय निदेशालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील १०० महिलांना डिजिटल साक्षरतेबाबत एकदिवसीय शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले.
१८ जानेवारी रोजी टाउन हॉल येथे झालेल्या या शिबिरात दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्ड, नाशिकच्या प्रभारी प्रादेशिक संचालिका सारिका डफरे ह्या उपस्थित होत्या. जळगाव पिपल्स बॅँकेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.
यावेळी सारिका डफरे यांनी उपस्थित कामगार महिलांना त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच सध्याचा युगातील डिजिटल व आर्थिक साक्षरतेचे महत्व, उपयोगिता, तसेच आॅनलाईन फ्रॉड होऊ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावी यावर माहिती दिली तसेच ई-श्रम कार्ड, पंतप्रधान श्रमयोगी आणि पेन्शन आदी योजनांविषयीदेखील माहिती दिली. अॅड. तिलोत्तमा पाटील यांनी महिलाच्या हक्क व अधिकार संदभार्तील विविध कायद्यांची ओळख अतिशय सोप्या शब्दात करून दिली. जळगाव पिपल्स बॅँकेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र्र पाटील यांनी महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी समुह सहायता बचत गटाच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले.
समारोपप्रसंगी उपविभागीय पोेलीस अधिकारी राकेश जाधव यांनी आर्थिक सुरक्षितता तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन आॅनलाइन फ्रॉड होणार नाहीत, यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नये, म्हणून आवाहन केले. शेवटी राकेश जाधव यांच्याहस्ते लाभार्थी प्रशिक्षणार्थी महिलांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले तर यशस्वीतेसाठी भारती दिनेश पाटील, जयश्री संदिप बारी आणि नम्रता विजय जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.