जळगाव मिरर | ८ जुलै २०२३
राज्यातील सत्तेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा उघडपणे होवू लागल्या आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या देखील चर्चेला उत आला असून त्यावर आता शिंदे गटातील नेते व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री झालेले अनिल पाटील हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले. जळगाव शहरात स्वागत झाल्यानंतर अमळनेरला जात असताना त्यांनी पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. मंत्री गुलाबरावांनी त्यांचे भगवी शाल घालून स्वागत केले.
ना.पाटील म्हणाले कि, ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आम्ही शिवसेनेत असतांना सुद्धा हाक दिली होती आता त्याबाबत पंचाग बघावे लागेल. तो दोघांचा व्यक्तीगत विषय आहे. ते एकत्र येत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहे तर शिंदे गटाचे आमदार उध्दव ठाकरे गटाकडे परत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात तुमचेही नाव असल्याबाबतही पत्रकारांनी त्यांना विचारले. सांगेल मी तुम्हाला तसे, तसे तर काही नाही, असेही मंत्री पाटील म्हणाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याचे मंत्री असल्याने सदिच्छा भेट देण्यासाठी अनिल पाटील आले होते. त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्याचे आता तीन मंत्री झाले आहेत. जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा, यासाठी निश्चितपणाने पुढील काळात मंत्री अनिल पाटील काम करतील. त्यांनी भगवे विचार स्विकारलेले आहेत. त्यामुळे त्यांचे भगवी शाल घालून स्वागत केले. शिवसेना-भाजपच्या विचारांशी ते जुळले आहेत. शाल अचानक त्या रंगाची आली. भगवी शाल ही काही पक्षाची नाही.छ्त्रपती शिवाजी महाराजांनी भगवा रंग स्वीकारला होता. साधू संत भगवे वस्त्र परिधान करतात. हा रंग त्यागाचे प्रतिक आहे. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याबाबतही पत्रकारांनी त्यांना विचारले. थोडीफार नाराजी तर राहणारच आहे. काहींना मंत्रीपदे मिळणार होती. त्यांच्यात तिसरा आल्याने आमदारांना वाटणं साहजीकच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांची नाराजी दूर केली आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या शपथविधीबाबतही पत्रकारांनी विचारले असता, माझ्यामते १० जुलै रोजी व्हायला पाहिजेत,असे मंत्री पाटील यांनी सांगितले.