
जळगाव मिरर | २० मे २०२६
चोपडा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून डोक्यात दगड मारून खून केला. त्यानंतर पीडितेला काही अंतरापर्यंत ओढत नेणाऱ्या चोपडा येथील नराधम अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (वय २२) याला अमळनेरचे जिल्हा सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांच्या न्यायाालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावातील एका शेतमजुराने गावातील शेती निम बटाईने करायला घेतली होती. त्याने आपल्या चारही मुलींना त्या शेतात निंदणीसाठी पाठवले होते. त्या शेतापासून जवळ असलेल्या गोलबर्डी गावातील एका महिलेकडे तिचा भाऊ अंकेश पुण्या बारेला आला होता. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी त्या मजुरांच्या तीन मुली रडत व पळत घरी आल्या आणि त्यांनी त्यांच्या आईला अंकेश आमचा पाठलाग करत होता, असे सांगितले. तसेच आमच्या एका बहिणीला वाघ्या नाल्यात ओढून घेऊन गेला. त्यानंतर मुलीच्या आई, वडीलांनी शोध घेतला असता भगवान पाटील यांच्या कपसाच्या शेतात पीडित मुलगी नग्न अवस्थेत आढळली होती. तिच्या डोक्यावर जखम झालेली होती. तर शेताच रक्ताने माखलेला दगड पडलेला होता.
न्या. सी. व्ही. पाटील यांनी आरोपीला दोषी धरत भारतीय न्याय संहिता कलम ६५, १०३(१) व पोस्को कायद्यान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीने पीडितेच्या वडिलांना ३० हजार तसेच शासनाने २५ हजार रुपये पीडितेच्या कुटुंबाला द्यावेत, असेही आदेश दिले. हा खटला सुरू असेपर्यंत आरोपी कारागृहात होता. त्याला जिल्हा कारागृहात रवाना केले. पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय उदयसिंग साळुंखे, हे. कॉ. प्रमोद पाटील, पुरुषोत्तम वाल्डे, राहुल रणधीर, सतीश भोई, भरत ईशी यांनी सहकार्य केले.
पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले असता आरोपीने मयत मुलीवर अत्याचार करून तिला नग्नावस्थेत ओढत नेल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुण्या बारेला (रा. बालवाडी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. पाटचारी, चोपडा) याला ८ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली होती.
हा खटला अमळनेरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड. के. . के. आर. बागुल यांनी यात १४ साक्षीदार तपासले. त्यात न्या. सी. व्ही. पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूरी दाभाडे, डॉ. चंद्रहास पाटील, पवन पाटील, पो. नि. मधुकर साळवे, पो. नि. कावेरी कमलाकर, उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांची साक्ष तसेच शेतात, कपड्यावर, चपलांवर पडलेल्या रक्ताचे डीएनए तपासून खात्री केली. तर सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद करताना आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.





















