
जळगाव मिरर | १९ मे २०२६
मागील भांडणाचा राग मनात धरून हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरात घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रस्त्यावरील राणीपार्क हॉटेलचे संचालक प्रफुल्ल बापुसाहेब देशमुख हे १८ मे रोजी मध्यरात्री हॉटेल बंद करून उत्तम टॉवर परिसरातील आपल्या निवासस्थानी जात होते. घराबाहेर वाहन उभे करून ते खाली उतरताच दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांना गाठले. यावेळी संशयित हर्षल दीपक राठोड (रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याने जुन्या भांडणाचा वाद उकरून काढत प्रफुल्ल देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढविला. हल्लेखोराने देशमुख यांच्या दंड, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, स्वतःचा बचाव करण्यासाठी देशमुख यांनी हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांनाही गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून भाऊ व मित्र तातडीने घटनास्थळी धावून आले. त्यांना येताना पाहताच दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या प्रफुल्ल देशमुख यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.
या प्रकरणी प्रफुल्ल देशमुख यांच्या फिर्यादीवरून हर्षल दीपक राठोड व त्याच्या साथीदाराविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, दुखापत करणे व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागे जुन्या वादातून सूडभावना असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.





















