
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल केल्याच्या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी ओळख वाढवत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात शेकडो तरुणींचा बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, भाजप खासदार अनिल बोंडे यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे १८० तरुणींचे शोषण व ३५० अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच हे कृत्य एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
या टोळीने स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून हे जाळे विस्तारल्याचा आरोप असून, संबंधित आरोपींचे मोबाईल जप्त करून कॉल डिटेल्स व संपर्कांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. चिखलदरा परिसरातील हॉटेल्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या रॅकेटचा मोठा खुलासा होऊ शकतो, असेही बोंडे यांनी नमूद केले.





















