जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३
राज्यातील आमदार व मंत्र्यांचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांचे पुन्हा एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात टीका – टिपण्णी सुरू झाली. “गिरीश महाजनांचे दाऊद इब्राहिमचे हस्तक सलीम कुत्ताबरोबर संबंध असल्यानं एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडसेंनी केली,” अशी मागणी खडसेंनी विधानपरिषदेत केली. तर, खडसेंच्या पोटात दुखत असल्याची टीका महाजनांनी केली होती. याला खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, “एकनाथ खडसेंच्या पोटात दुखत आहे. खडसेंना मुरूम चोरल्याप्रकरणी १३७ कोटी तर, भोसरी एमआयडीसी प्रकरणात २७ कोटींचा दंड झाला आहे. खडसेंच्या सर्व मालमत्ताही जप्त केल्या आहेत. आता खडसेंच्या पायात चप्पल सुद्धा घालायला राहणार नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. म्हणून ते बावचळले आहेत,” असा टोला महाजनांनी लगावला आहे.
याला खडसे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी वैफल्यग्रस्त आहे की चांगला हे महाराष्ट्र पाहतोय. गिरीश महाजन उत्तर देऊ शकत नाहीत. महाजन सर्वसाधारण शिक्षकाचे चिरंजीव आहेत. त्यांच्याकडे गेल्या १० वर्षात करोडोंची मालमत्ता कशी आली? या मालमत्तेच्या चौकशी मागणी मी केली. तरीही सरकार चौकशी करत नाही.”