
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, युवा नेते आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेत कार्याध्यक्ष पदाची परंपरा नवीन नाही. २००३ साली पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे पद निर्माण केले होते. त्या पदावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे संघटन बळकट करत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. आता त्याच धर्तीवर आदित्य ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचा वर्धापन दिन जवळ येत असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दिवशी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव मांडला जाऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
सध्या आदित्य ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नेते आणि युवासेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, कार्याध्यक्ष पद मिळाल्यास पक्षाच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत त्यांचा अधिक थेट सहभाग वाढणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही काळात आदित्य ठाकरे यांनी मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दौरे करत जनसंवाद यात्रेद्वारे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला आहे. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ नेत्यांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.
जर आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी हा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरेल. नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळेल आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक सज्ज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या सर्व घडामोडींवर अंतिम शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





















