
जळगाव मिरर | १० जून २०२५
गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक ठिकाणी तलवार व कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरून दहशत माजवण्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्तींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने इस्माइल गल्लीतून एका संशयितास अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ९ जून २०२५ रोजी पो.ना. श्रीकृष्ण ईश्वरू यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, बोदवड ते शेलवड रस्त्यावरील महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन येथे एक इस्माइल बोबडे नावाचा युवक तलवार व कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती समोर आली. यावरून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. रवींद्र बारी यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून संशयित बोबडे याला पकडले.
त्याच्याकडून एक लोखंडी कोयता व एक तलवार हस्तगत करण्यात आली. प्राथमिक चौकशीत संशयिताचे नाव श्रावण जंगारे, वय २६, रा. माजी बाडा, बोबडे वाडा, बोबडे ता. बोदवड असे असल्याचे समोर आले. त्याच्याकडून मिळालेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४५०० रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३७ (१) तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.