जळगाव मिरर | १६ जुलै २०२६
एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे स्वयंपाक करत असताना अज्ञात प्राण्याने चावा घेतल्याने ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारासाठी नेत असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, चावा घेणारा प्राणी अद्याप सापडला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा सुरेश पाटील (वय ३५) या गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या घरात स्वयंपाक करत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागील कमरेजवळ कोणत्यातरी अज्ञात प्राण्याने चावा घेतला. “मला काहीतरी चावले आहे,” असे त्यांनी घरातील सदस्यांना सांगताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दुचाकीवरून स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले.
स्थानिक डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी रिक्षाने त्यांना जळगावकडे रवाना केले. मात्र, पिंप्री बुद्रुकपासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पोहोचताच मनीषा पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आणि उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. चावा नेमका कोणत्या प्राण्याने घेतला, याचा शोध घेण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी संपूर्ण घराची आणि परिसराची कसून तपासणी केली. मात्र, घरात सर्प किंवा अन्य कोणताही विषारी प्राणी आढळून आला नाही. त्यामुळे मनीषा पाटील यांना नेमके कोणत्या प्राण्याने चावा घेतला, याबाबत अद्यापही गूढ कायम असून, याचा तपास सुरू आहे.
मनीषा पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी तसेच सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. त्या पिंप्री बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम कौतिक पाटील यांच्या स्नुषा होत. त्यांच्यावर गुरुवार, १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पिंप्री बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, चावा घेणाऱ्या अज्ञात प्राण्याचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




















