जळगाव मिरर | १ सप्टेबर २०२४
राज्यातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र शिवरायाचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही. तर नाना पटोले आणि शरद पवार यांनी मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवद्रोही सत्ताधारी लोक रस्त्यावर उतरले असून मविआ विरोधात आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात जे वातावरण आहे, त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहात असा आरोप आहे. मी म्हणेन ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे. खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही, म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली नसती तर राज्याने तुम्हाला सोडले असते का?, असा सवाल ठाकरेंनी उपसथित केला आहे.
खासदार शरद पवार म्हणाले की, वाऱ्यामुळे पुतळा पडला, असे सांगितले जाते. गेटवेवर हा पुतळा 50 वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांची प्रतिमा पडली. ती फक्त महाराजांची प्रतिमा नव्हती, ती महाराष्ट्राचा धर्म आणि राज्याचा अवमान या सरकारने केला.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान सरकारकडून झाला. महाराज आमचे दैवत आहेत, त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक झालो. देशातील शिवप्रेमींचा यांनी अवमान केला आहे. जनतेने पुतळा कोसळला त्यांच दिवशी महाराजांची माफी मागत असे शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नाही, असा संकल्प केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.