जळगाव मिरर | १० जुलै २०२६
शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ एचपी पेट्रोल पंपासमोर एमआयडीसी पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत विना परवाना वाळूची वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला. या कारवाईत सुमारे सहा ब्रास वाळूसह तब्बल १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून मोठ्या आकाराच्या हायवा टिप्परमधून विना परवाना अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ८ जुलै रोजी पहाटे सुमारे ४.१५ वाजता सुप्रिम कॉलनी स्टॉपजवळ एचपी पेट्रोल पंपासमोर सापळा रचला. यावेळी एमएच-३९ एसी-१५३० क्रमांकाचा हायवा टिप्पर अडवून त्याची तपासणी करण्यात आली. वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा अधिकृत परवाना मागितला असता तो कोणतीही वैध कागदपत्रे सादर करू शकला नाही. तसेच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी वाहनाची सखोल तपासणी केली असता टिप्परमध्ये सुमारे सहा ब्रास वाळू आढळून आली.
यानंतर पोलिसांनी टिप्पर आणि वाळूसह एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक रविंद्र भगवान कोळी (वय ४०, रा. पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास कुंभार करीत असून, अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात एमआयडीसी पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.




















