जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
राज्यातील भिवंडी शहरासह ग्रामीण भागात दि.२८ रोजी मंगळवारी रात्री साडेआठ पावणे नऊ वाजताच्या सुमारास दोन ते तीन सेकंदाचे भूकंपाचे सौम्य हादरे बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तर कल्याणमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील भादवड, टेमघर पाडा, शांतीनगर तर ग्रामीण भागातील सरवली, राजनोली, सोनाळे या गावात हे हादरे जाणवले आहेत. हादरे जाणवल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घराबाहेर पळ काढला. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरणसुद्धा पसरले होते. या घटने बाबत भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हादरे बसल्याची नोंद रिश्टर स्केलमध्ये आलेली नसून याबाबतचा अहवाल तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवला असून तेथून माहिती आल्यानंतरच नक्की हे हादरे कशामुळे बसले, हे स्पष्ट होईल, अशी माहिती दिली आहे. दरम्यान कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात व्हर्टेक्स इमारतीतील भीषण आगीमुळे एकीकडे शहरात खळबळ उडाली असतानाच कल्याणच्या सापर्डे गावाचा परिसर धक्क्यांनी हादरल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशी यांनी दिली. तर दुसरीकडे कोनगाव तसेच भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये धक्के जाणवले विशेष म्हणजे दोन दिवांपूर्वीच मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्येही धक्के जाणवले. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक काही सेकंद किंवा मिलीसेकंदासाठी अचानक जमीन हादरल्याची माहिती हादरे जाणवलेल्या गावातील स्थानिक नागरिकांनी दिली. मात्र काही कळायच्या आत हे हादरे जसे जाणवले तसेच थांबले, अशी माहिती या स्थानिक रहिवाशांनी दिली.